पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केन्द्र गुरुकुल विभागाच्या वतीने आयोजित नाटकामध्ये प्रभू रामचंद्र व सीता माता यांच्या विषयी अपशब्द काढले गेले व त्यांची विटंबना करण्यात आली. त्याविरोधात अभाविप पुणे महानगर व अन्य संघटनांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीला घेऊन निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही डाव्या विचारांच्या संघटना ठरवून अशा गोष्टी करत असल्याचा आरोप यावेळी अभाविपकडून करण्यात आला. यांवर लवकरात लवकर विद्यापीठाने कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.ललित कला केंद्रामध्ये घडलेल्या प्रकारातील दोशींवर पोलिसी कारवाई करण्यात आली पण अजून सुद्धा विद्यापीठाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे सदर मोर्चा समस्त हिंदू बांधवांकडून काढण्यात आला. याचे नेतृत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले.
प्रभू श्री रामचंद्र ,सीतामाता ही सर्व भारतीयांची अस्मिता आहे. आणि या अस्मितेला वारंवार ठेच पोचवल्या जात आहे. एफटीआयआय असेल किंवा विद्यापीठ असेल या सर्व ठिकाणी अशा कृती अभाविप मोडून काढेल. असे मत पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले.
सर्व देश विरोधी व समाजघातकी संघटनांच्या समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एका भिंती सारखी उभी आहे त्यांना कोणत्याही पद्धतीचा थारा दिला जाणार नाही इथून पुढे विद्यापीठांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अभाविप काम करेल. असे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे म्हणाले.