न्यूयॉर्क – अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरुच आहे. जवळपास ६४ टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. यानुसार, डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बिडेन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. ज्यो बिडेन यांनी यापुर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पडलेल्या मतांचा विक्रम मोडला आहे. यामुळे बिडेन यांचाच विजय होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
नॅशनल पब्लिक रेडिओच्या वृत्तानुसार, बिडेन यांना ४ नोव्हेंबरपर्यंत ७.०७ कोटी मते पडली होती. एवढी मते यापुर्वी कोणत्याही उमेदवाराला मिळाली नव्हती. बराक ओबामा यांना २००८ मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा ही संख्या तीन लाखांनी आधिक आहे. ओबामा यांना २००८ मध्ये सहा कोटी ७४ लाख ९८ हजार ५१६ मते मिळाली होती.
बिडेन राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार टक्कर देत आहेत. आणि लोकप्रियतेच्या बाबतीत ट्रम्पपेक्षा बिडेन २७ लाख मतांनी आघाडीवर आहेत. महत्वाच्या राज्यातही बिडेन यांना अधिक मते मिळाली आहेत. परंतु, अद्यापही पूर्ण मतमोजणी व्हायची आहे. कॅलिफोर्नियात अद्याप ६४ टक्केच मतमोजणी झाली आहे. अद्याप दोन कोटी ३० लाख मतांची मोजणी व्हायची असल्याने लढतीतील चुरस अद्याप कायम आहे.