दिल्लीतील मतदानाच्या आधी सुनावणी घेण्यास नकार
नवी दिल्ली – दिल्लीत शाहीनबागेत गेल्या अनेक दिवसांपासून महिला व नागरीकांनी सीएए कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. सध्या दिल्लीत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेवर कोणताही प्रभाव पडू नये म्हणून मतदानानंतर म्हणजेच सोमवारी या याचिकेवर निर्णय घेतला जाईल असे कोर्टाने आज जाहीर केले.
शाहीनबाग आंदोलनामुळे लोकांना समस्या निर्माण झाली आहे याची आम्हाला कल्पना आहे. ही समस्या कशी सुटेल हे पहायला पाहिजे. पण सोमवार च्या आधी या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही असे कोर्टाने आज नमूद केले.
ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकादारांपैकी एका वकिलाने आज झालेल्या सुनावणीच्यावेळी कोर्टात दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मदतान 8 फेब्रुवारीला असल्याचे कोर्टाच्या निदर्शनाला आणले.
त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की म्हणूनच आम्ही यावर सोमवारी सुनावणी घेऊ आम्ही या निवडणुकीवर प्रभाव पडेल असा निर्णय आम्ही का घेऊ असा सवालही कोर्टाने याचिकादाराच्या वकिलांना केला. सोमवारी या सुनावणीसाठी तयारी करून या अशी सुचनाही कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना केली.