पुणे – मराठी ही ज्ञानभाषा व्हावी तसेच ती उद्योगाची आणि रोजगाराची भाषा व्हावी, यासाठी विद्यापीठीय स्तरावर शिकविल्या जाणाऱ्या सर्व विद्याशाखेत मराठी हा विषय अनिवार्य करावा, असा ठराव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. विद्यापीठ स्तरावर असा ठराव करणारे पुणे विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.
अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास मंडळाची बैठक झाली. गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात मातृभाषेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भाषा टिकविण्यासाठी तसेच मराठी भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर प्रत्येक विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविली जावी. विद्यापीठीय स्तरावर मातृभाषा शिकविल्यास ती व्यवसायाची, उद्योगाची आणि ज्ञानभाषा होण्यास मदत होईल, अशी चर्चा झाली. त्यानंतर मराठी अनिवार्य करण्याचा ठराव बैठकीत एकमताने मांडण्यात आले.
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळ मराठी साहित्य व मराठी भाषा सर्व विद्याशाखेत अनिवार्य करण्यासाठी आग्रही आहे. हे अभ्यास मंडळ सातत्याने शासन दरबारी व वरिष्ठांशी याबाबत पत्रव्यवहार करेल. कारण, सर्व विद्याशाखेत मराठीतून शिक्षण दिल्यास मातृभाषा ही रोजगाराची भाषा होण्यास मदत होईल.” – डॉ. संदीप सांगळे, अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ