Maratha Reservation – मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेले आंदोलन मराठवाड्यात प्रचंड तापलेले पाहायला मिळत आहे. जालना येथे अंदोलकांकडून छाया पवार या महिला तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली आहे. तर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तापले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एसटी सेवा रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चारही जिल्ह्यातील बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यात एकूण 30 आगर असून, अंदाजे 2800 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा परिवहन विभागाला फटका बसतांना पाहायला मिळत आहे. नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे आयजी महावरकर आणि हिंगोलीच्या पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या सुचनेनुसार एसटी विभागाने बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
परभणी आणि हिंगोली दोन जिल्ह्यातील एकूण 7 आगारातील 380 बसेचच्या 2800 फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास 350 बसेस जागेवर उभ्या आहेत. तसेच, रविवारी सायंकाळी पाच वाजेनंतर उद्या बस सुरु करायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
अंदोलकांकडून एसटी बसेस लक्ष्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड आणि नांदेडमध्ये शनिवारी बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. बीडहून कल्याणकडे जाणारी एसटी बस चराटा फाट्याजवळ आली असता, यावेळी आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरवून या बसवर तुफान दगडफेक केली. यामध्ये बसच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत.
तर दुसऱ्या घटनेत नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केली. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झाले. या प्रकरणी पोलीस दगडफेक करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत. मराठवाड्यातील या घटना पाहता एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून एसटी बसेस रद्द करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
बावनकुळेंना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कल्याणमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला. तसेच बावनकुळे यांच्याविरोधात जोरदार घोषणेबाजी केली.
दरम्यान, काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) भेट देण्यासाठी आले असता त्यांनाही काळे झेंडे दाखविण्यात आले होते.