पुणे – रोबोटिक्स, कोडिंग, खगोल विज्ञान या क्षेत्रात अनेक करिअर च्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. स्पेस लॅब च्या माध्यमातून अशा अनेक विद्यार्थ्यांची जडण घडण होऊ शकते, असे मत इस्रोचे माजी संचालक पद्मश्री प्रमोद काळे यांनी व्यक्त केले आहे.
सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स तर्फे व्हि.एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पिंपळे सौदागर य़ेथील पी.के इंटरनॅशनल स्कूल अँड जुनिअर कॉलेज मध्ये शैक्षणिक रोबोटिक्स व स्पेस लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी इस्रोचे माजी वैज्ञानिक सतीश राव, सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्सचे संचालक हर्षद गेलडा, शाळेचे संस्थापक प्रा.डॉ. जगन्नाथ काटे, प्रशालेच्या प्राचार्या प्रा. डॉ. धनश्री सोनवणे, मास्टर माईंड स्कूलच्या संस्थापिका जयश्री गवळी व प्राचार्या प्रतिबा नायर आदी उपस्थित होते.
इस्रोचे माजी वैज्ञानिक सतीश राव यांनी रोबोटिक्स व स्पेस लॅब बद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान शिक्षण संदर्भात त्याची रुची वाढावी या उद्देशाने या सेंटरची निर्मिती करण्यात आली. या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, रोबोटिक्स, कोडींग, खगोल विज्ञान या संदर्भात शिक्षण देण्यात येणार आहे.
आजकालच्या जगात माणसांपेक्षा जास्त काम मशिन्स किंवा रोबोट करतात. कंपन्यांमध्येही मशिन्सच्या माध्यमातूनच सर्वाधिक काम केलं जातं. त्यामुळे आता शिक्षण क्षेत्रात रोबोटिक्सला प्रचंड महत्त्वं प्राप्त झालं आहे असे शाळेचे संस्थापक प्रा.डॉ.जगन्नाथ काटे यांनी सांगितले. प्रशालेच्या प्राचार्या प्रा. डॉ. धनश्री सोनवणे यांनी देखील २१ व्या शतकातील रोबोटिक्सचे महत्त्व विद्यार्थी व पालकांना पटवून दिले.