मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्यावर आरोप केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीन दिलेली दिलेली तक्रारच वाचून दाखवली.
हिरेन यांच्या पत्नीची तक्रार वाचून दाखवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी सदर कार वापरली होती. ४ महिने कार वाझे यांच्याकडे होती. २६-२-२०२१ वाझे यांच्यासोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि त्यांच्याच सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करुन घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असेही सांगितले होते.
याप्रकरणी मनसुख यांनी वकीलांशी बोलून घ्यायला सांगितले होते. हा खून वाझे यांनी केला असावा, असा माझा संशय आहे. २०१७ मध्ये ४० लाखांच्या खंडणी प्रकऱणात धनंजय गावडे, सचिन वाझे यांची नावे समोर आली. दोघांनीही अटकपूर्व जामीन घेतला होता. मनसुख यांचे शेवटचे लोकेशन गावडेंकडे होते आणि त्यानंतर ४० किमी दूर मृतदेह सापडतो. मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला. पण ओहोटी असल्याने मनसुख यांचा मृतदेह बाहेर आला. सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना त्यांना अटक करण्यात यावी. सचिन वाझे यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा आरोप फडवीसांनी यांनी केला.
या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, ठाणे शहर पोलीस यांच्याकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे गृह विभागाने दिलेल्या आदेशानंतर वर्ग करण्यात आला आहे. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, मृत मनसुख हिरन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांच्या फिर्यादीवरून द वि प पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.