कारखान्याच्या नावाने आमदारकी भोगणाऱ्यांना जनता घरी बसवेल

मनोज घोरपडे यांची बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका

कामेरी – कराड उत्तर मतदार संघावर गेल्या 20 वर्षांपासून घराणेशाहीचा पगडा राहिला आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या त्यागावर उभ्या राहिलेल्या सहकारी कारखान्याला आमदारांनी राजकीय अड्डा बनवले आहे.

गेली 15 वर्षे आमदार असताना कराड तालुक्‍यातील गावाचा विकास न करता या गावांना भकास करत फक्त स्वतःच्या सन्मानासाठी ते आमदार म्हणून मिरवत आहेत. कारखाना आपल्या हातात असताना सर्वसामान्य जनता कुठे जातेय असे गृहीत धरून ते राजकारण करत असून आता ते चालणार नाही, कारखान्याच्या नावाने आमदारकी भोगणाऱ्यांना जनताच आता घरी बसेल, असे उद्‌गार कराड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी काढले. मतदार संघातील प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी कराड उत्तर विधानसभेसाठी मोठ्या तयारीने शड्डू ठोकत “हम भी कुछ हम नही’ असे म्हणत उमेदवारी अर्ज दाखल करताना विराट शक्तीप्रदर्शन केल्याने मनोजदादा घोरपडे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

आपल्या 5 वर्षातील संपर्काच्या व केलेल्या विकास कामाच्या ताकदीवर त्यांनी आज कराड तालुक्‍यातील मेरवेवाडी, वाघेरी, अंतवडी, करवडी, विरवडे, सुर्ली, कोरेगाव, टेंभू, कामटी, हजारमाची, वनवासमाची, ओगलेवाडी या गावात प्रचारफेरी,गाठी-भेटी व कोपरा सभा घेतल्या. प्रचार रॅंली गावात पोहचताच ठिकठिकाणी मनोजदांदाचे नागरिकांनी व तरूण मंडळे यांनी उस्फूर्तपणे स्वागत केले.

मनोज घोरपडे म्हणाले, आजवर आमदारांकडून ऊस उत्पादकांची अडवणूक होत होती, मात्र, नवीन कारखान्याची उभारणी करुन आम्ही शेतकऱ्यांना पर्याय उभा केला आहे. त्यामुळे यापुढे कारखान्यावर आमदारकी मिळते हे आता आमदारांनी विसरावे, कारखानदारी व आमदारकी ही गणिती वेगळी आहेत, आमदार हा विकास करणारा असावा निष्क्रिय नसावा.

यापुढे जनतेला विकास करणारा सर्वसामान्य लोकांच्यातील आमदार हवा आहे. त्यामुळे कराड उत्तरमध्ये यावर्षी घराणेशाहीचा अस्त होऊन परिवर्तन होणार हे निश्‍चित आहे, सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सामील होऊन इतिहास घडवूया. इस्माईल पटेल, जगदीश कणसे, अमोल पवार, शिवाजी माने, प्रितम शिंदे, विशाल शिंदे, संतोष पाटील, बाळासाहेब पाटील, अमोल माने, सुहास महाडिक, राजु चेअरमन, सयाजी शिंदे, सुभाष शिंदे, मधुकर शिंदे या प्रमुख नेत्यासह शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.