दसऱ्याच्या मुहूर्तावर 5 हजार 932 वाहनांची नोंद

मागील वर्षीपेक्षा यंदा काही प्रमाणात वाढ

पुणे -साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने अनेकजण वाहन खरेदी करतात. यादिवशी “शोरुम्स’देखील गर्दी पाहायला मिळते. यंदा देखील वाहन खरेदी आणि आरटीओच्या महसुलात काही अंशी वाढ झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे यंदा एकूण 5 हजार 932 वाहनांची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी 5 हजार 850 वाहनांची नोंद झाली होती.

मागील वर्षी झालेल्या सुमारे साडेपाच हजार वाहन नोंदणीतून कार्यालयाला 20 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यामध्ये यंदा केवळ 82 वाहनांची भर पडली असली. तरी मात्र 2 कोटी 54 लाख 25 हजार 589 रुपयांची महसुलात वाढ झाली आहे. यावर्षी एकूण 23 कोटी 29 लाख 25 हजार 589 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून वाहन घरी आणण्यासाठी सुमारे 1 आठवडा आधीपासून वाहन नोंदणी प्रक्रिया सुरू होते.

शहरातील वाहनांची संख्या 40 लाखांपेक्षा जास्त आहे. “एक व्यक्‍ती, एक वाहन’ या सूत्राचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना देखील सणांच्या निमित्ताने वाहन खरेदी करण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहराच्या वाहतूक कोंडीमध्ये अजूनच भर पडणार आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

यंदाच्या वर्षी 15 हजार नवीन वाहने रस्त्यावर
वाहन खरेदी करताना बहुतांशवेळा साडेतीन मुहूर्त साधले जातात. साडेतीन मुहूर्तांवर शहरामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसऱ्याच्या निमित्ताने वाहनखरेदीने वेग घेतला असल्याचे चित्र बाजारात आहे. 2019 मध्ये गुढीपाडव्याला तब्बल 7 हजार 118 तर अक्षय्य तृतीयेला 3 हजार 698 वाहने तर, दसऱ्याला 5 हजार 932 वाहनांची नोंदणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सुमारे 15 हजार नवीन वाहने रस्त्यावर उतरली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.