शेतकऱ्यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबद्ध

शिवेंद्रसिंहराजे : “अजिंक्‍यताऱ्या’चा 36 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात

सातारा – अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात एक सक्षम सहकारी संस्था म्हणून ओळख आहे. सभासद, कामगारांचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळे आपल्या संस्थेचा नावलौकिक आहे. इथेनॉल निर्मितीबाबत शासनाचे धोरण सकारात्मक असून आपला कारखानाही इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देणार असून त्यातून उत्पन्न वाढणार आहे.

पर्यायाने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना चांगला दर देता येणार आहे. या गळीत हंगामातही शेतकऱ्यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. शेंद्रे येथील अजिंक्‍यतारा साखर कारखान्याचा 2019-20 च्या गळीत हंगामाचा 36 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर उत्साहात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. सौ. वेदांतिकाराजे भोसले, रूद्रनीलराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्‍वास शेडगे, मान्यवर व संचालक उपस्थित होते.
शिवेंद्रराजे म्हणाले.

गेल्या 10-12 वर्षांत कारखान्याचा प्रगतीचा आलेख सातत्याने चढता असून सभासद, कामगार, ऊसतोडणी कामगार, वाहतूक यंत्रणा या सर्वांची विश्‍वासाहर्ता वाढवली आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असून उसाला वेळेत आणि एफआरपीप्रमाणे दर दिला जात आहे. शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासणारी संस्था आणि संस्था अडचणीत असेल, तर त्यासाठी जीवाचे रान करणारे सभासद, कामगार, असे घट्ट नाते कारखान्यात पाहायला मिळते. या हंगामात पाच लाघ मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असले तरी त्यापेक्षाही जास्त गाळप केले जाईल. जास्तीत जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असून तीन ते चार महिन्यात गाळप संपवण्याचा प्रयत्न केला जाईल.

नवीन मशिनरीमुळे साखर उताराऱ्यात वाढ होणार आहे. आगामी काळात कारखान्याची गाळप क्षमता वाढवली जाणार आहे. साखरेला उठाव नसल्यास इथेनॉल निर्मितीचा पर्याय सहकारी साखर कारखान्यांसाठी चांगला ठरेल. शासनाने इथेनॉलला चांगला दर दिल्याने आपण साखरेचे उत्पादन कमी घेऊन 20 लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार आहोत. हंगाम यशस्वी करण्यासाठी नोंदवलेला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्याला द्यावा.

ज्येष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्‍त केले. विश्‍वास शेडगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, सौ. कमल जाधव, प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, प्रतीक कदम, चंद्रकांत जाधव, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य राहुल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, छाया कुंभार, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, रवींद्र कदम, धर्मराज घोरपडे, नारायण कणसे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, गणपतराव शिंदे, किरण साबळे-पाटील, सतीश चव्हाण, ऍड. सूर्यकांत धनावडे, सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, रामचंद्र जगताप, पंडितराव सावंत, अरविंद चव्हाण, दादा शेळके, तात्या वाघमळे, बाळासाहेब लोहार, कामगार युनियनचे अध्यक्ष धनवे, सरचिटणीस सयाजी कदम, अजिंक्‍य उद्योग समूहाचे आजी-माजी संचालक, शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.