नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून ते देखरेखीखाली आहेत, असे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सोमवारी सांगितले. 87 वर्षीय मनमोहन सिंग यांना रविवारी रात्रीच्या सुमारास अस्वस्थ वाटायला लागल्याने “एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते.
नवीन औषधांच्या सेवनामुळे त्यांना रिऍक्शन आली. तसेच त्यांना तापही आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा ताप येण्यामागे औषधाची रिऍक्शन हे कारण आहे का अन्य काही कारण आहे, हे तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या जात आहेत.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व निकष अपेक्षित असेच आहेत. “एम्स’मधील कार्डिओथोरॅसिक सेंटरच्या डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून आहे, असेही सूत्रांनी सांगितले.