कोलकाता: पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे बंधू कार्तिक बॅनर्जी व अन्य काही लोकांसमवेत मद्यपान करीत असल्याचा एक खोटा फोटो केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रिओ यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर प्रसारित केला होता. त्यावरून कोलकाता पोलिसांनी सुप्रिओ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेली कलमे अजामीनपात्र स्वरूपाची आहेत.
बाबुल सुप्रिओ हे केंद्रीय मंत्री असून ते बंगाल मधील भाजपचे खासदारही आहेत. खोटे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे हा गुन्हा आहे. त्यावरून त्यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून सुप्रिओ यांच्या सह हा फोटो प्रसारीत करणाऱ्या अन्य लोकांच्या विरोधातही पोलिसांनीही गुन्हे दाखल केले आहेत.
सदरचा फोटो खोटा असल्याचा खुलासा दक्षिण कोलकात्याच्या पोलीस उपायुक्तांनी केला आहे. या संबंधात खुलासा करताना सुप्रिओ यांनी म्हटले आहे की, जो फोटो सोशल मीडियावर या आधीच व्हायरल झाला आहे तोच फोटो मी सोशल मिडीयावर टाकला आहे. राज्याचे पोलीस तृणमूल कॉंग्रेसचे हस्तक आहेत असा आरोपही सुप्रिओ यांनी केला आहे. दरम्यान कार्तिक बॅनर्जी यांनीही सुप्रिओ यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.