नवी दिल्ली : संसदीय अर्थ स्थायी समितीवर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यांच्याच पक्षाचे दिग्वीजयसिंह यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली.
दिग्वीजय सिंह यांच्या नावाची शिफारस नगर विकास खात्याच्या स्थायी समितीसाठी करण्यात आली आहे. मनमोहनसिंग यांची नियुक्ती करता यावी म्हणून दिग्वीजयसिंह यांनी अर्थ खात्याच्या स्थायी समितीचा राजिनामा दिला होता. मनमोहनसिंग हे 1991 ते 96 या काळात नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री होते. ते या समितीवर 2014 ते जून 19 या काळात कार्यरत होते. नोटाबंदी, जीएसटी याबाबत या समितीने गेल्या सरकारमध्ये खूप महत्वाचे आक्षेप घेतले. त्यात मनमोहनसिंग यांचा वाटा मोठा होता.