मुंबई: माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पैठण तालुक्यातील भाजपाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय गोरडे आणि अप्पासाहेब गायकवाड यांनीदेखील यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. नेते छगन भुजबळ आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला. तसेच पैठण तालुक्यातील भाजपाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय गोरडे आणि अप्पासाहेब गायकवाड यांनीदेखील यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
जयंत पाटील यांनी माणिकराव कोकाटे यांचे पक्षात स्वागत केले. माणिकराव कोकाटे यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. त्यांच्यामुळे पक्षाला बळकटी येणार असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला सिन्नर तालुक्यात भक्कम आधार मिळेल असा विश्वास व्यक्सत करत पाटील यांनी माणिकराव कोकाटेंना सिन्नर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली.
पूर्ण राष्ट्रवादीचे संघटन तुमच्यासोबत आहे. विधानसभा निवडणुकीत सिन्नर ही जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची आहे, असे आवाहन यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची ग्वाही कोकाटे यांनी यावेळी दिली. तसेच आदरणीय शरद पवार साहेबांनी राज्यभर सुरू केलेल्या झंझावातात सहभागी होणार आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी अधिक ताकदवान करणार, असे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.