शिक्रापूर (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या तीन साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल होते. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केले असताना आज पोलिसांनी मंगलदास बांदल यांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने मंगलदास बांदल यांना एक जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या सह एका अनोळखी इसमावर शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.
यावेळी शिक्रापूर पोलिसांनी तातडीने मोठ्या चलाखीने व गोपनीय पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांना अटक केली होती.
त्यांनतर आज मंगलदास बांदल यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने मंगलदास बांदल यांचा जामीन नामंजूर करत त्यांना एक जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहे.