शिक्रापूर -शिरूर तालुक्यातील राजकारणातील जादूगार समजले जाणारे मंगलदास बांदल यांनी प्रथमच शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तसेच माजी खासदार आढळराव पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल हे कधी कोणत्या पक्षात जातील याचा कोणालाही नेम नाही. आजपर्यंत अनेक निवडणुका वेगळ्या ताकतीने लढवून त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना हादरे दिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वतः उमेदवार असल्याचे सांगत अचानकपणे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली. दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात जोरदार प्रचार करत खासदार आढळराव पाटील यांना पराभूत केले.
मात्र काही दिवसांपूर्वी बांदल यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिक्रापूर येथील एका कार्यक्रमात हजेरी लावत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे कौतुक केले. लोकसभा निवडणुकीदरम्यान माझ्याकडून चूक झाली आम्ही नवीन उमेदवार निवडून आणला परंतु ते मतदारसंघात दिसलेच नाहीत. पुढील काळात खासदार आढळराव पाटील यांना मदत करण्याचे त्यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान आंबेगाव मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्यासाठी आमची शिफारस केली होती. बांदल यांच्यासाठी फॉर्मदेखील आणलेला होता. मंगलदास बांदल यांची शिवसेनेशी असलेली जवळीक शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांनी नमूद केले. कार्यक्रमासाठी मंगलदास बांदल , जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यादेखील उपस्थित होत्या.
लवकरच भूमिका स्पष्ट करू
शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाला मी कारणीभूत आहे, हे मी स्पष्टच केलेले आहे. सध्या मी अपक्ष असून शिवसेनेत जाणार की नाही, कधी जाणार याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मंगलदास बांदल यांनी यावेळी सांगितले.