पुणे – संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या “ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेन्का’च्या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या येत्या दोन दिवसांत पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये सुरू होणार होणार आहेत.
याबाबत या लसीच्या उत्पादनाचे हक्क असणारी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारती विद्यापीठात करार झाला आहे. साडेतीनशे स्वयंसेवकांची त्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती भारती हॉस्पिटल ऍन्ड रीसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी दिली.
डॉ. ललवाणी म्हणाले, “चाचणीसाठी सीरम इन्स्टिट्यूटकडून करोना प्रतिबंधक लसीचे डोस आल्यानंतर ही चाचणी सुरू करण्यात येणार आहे. साधारण दोन दिवसांत या चाचणीला सुरुवात होणार आहे. 18 ते 99 वयोगटातील व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे. ज्यांना करोना नाही, त्याची लक्षणे नाही अशा व्यक्तींची ही चाचणी करणार असून, त्याआधीच्या ऍन्टिबॉडीजसह अन्य तपासण्या केल्यानंतरच या लसीची चाचणी करण्यात येणार आहे.’