नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील कालीघाट येथील सरकारी निवासस्थानात शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केल्याची घटना घडलीय. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असताना ही घटना घडली कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचसोबत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्तीने भिंतीवरून मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात प्रवेश केला. हा अज्ञात व्यक्ती रविवारी सकाळी त्यांच्या शासकीय वाहनाजवळ झोपलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांच्या नजरेत आल्यावर या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सुरक्षा भेदल्याची माहिती मिळताच आयुक्त विनीत गोयल यांच्यासह कोलकाता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या व्यक्तीने झेड श्रेणीची सुरक्षा कशी भेदली याचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिकारी तपासात गुंतले आहेत. सोबतच सुरक्षेचा भंग करण्यामागील हेतूबाबतही माहिती गोळा केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात घरात घुसणारी व्यक्ती एकतर चोर असावे किंवा मानसिकदृष्ट्य़ा अस्वस्थ असावा. मात्र, पोलिस वेगवेगळ्या बाजूने तपास करीत आहेत.
दरम्यान, कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा अत्यंत कडक असते. अशा परिस्थितीत कोणी सुरक्षा व्यवस्था तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आत जात असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्य़ा सुरक्षेत कडेकोट बंदोबस्त असताना देखील एक अज्ञात व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात कशी घुसली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.