पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘वाघिणी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत वाघिणी चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
वाघिणी चित्रपट प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती. पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा आधारावरच ममता बॅनर्जी यांच्यावरील वाघिणी चित्रपट निवडणूक आयोगाने पाहावा, अशी मागणी करणारे पत्र भाजपने दिले होते.
दरम्यान, १० एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, राजकीय व्यक्तीचे अथवा पक्षाचे गुणगान करणारा कोणताही चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटावर प्रदर्शनाच्या १ दिवस आधी बंदी घातली होती.