स्वच्छ सर्वेक्षण लीग 2020 मध्ये दुसऱ्या सत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर
कराड – मलकापूर नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण लीग 2020 च्या पहिल्या दोन तिमाही सत्रात आपले अग्रस्थान कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दुसऱ्या सत्रातील रॅंकींगमध्ये मलकापूर पालिकेने देशात दुसरा तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण लीग 2020 ही नवीन संकल्पना देशपातळीवर 4370 शहरांमध्ये म्हणजेच सर्व नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये नव्याने सुरु केली आहे. यामध्ये मलकापूर नगरपालिकेनेही सहभाग घेतला आहे. स्वच्छ सर्वेक्षण लीगचे एकूण तीन सत्र आहेत. पहिले सत्र 1 एप्रिल ते 31 जून, दुसरे सत्र 1 जुलै ते 30 सप्टेंबर व तिसरे सत्र माहे 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर असे आहे.
स्वच्छ सर्वेक्षण लीग 2020 च्या पहिल्या व दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर झाला असून, मलकापूर नगरपरिषदेस पहिल्या सत्रामध्ये देशात 54 वा तर महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळाला. तर दुसऱ्या सत्रात देशात 2 रा व महाराष्ट्रात पहिला क्रमांक प्राप्त झाला असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.
ते म्हणाले, दोन्ही सत्रामध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे श्रेय केवळ मलकापूरमधील नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व विशेष करुन शहरातील महिलांना देण्यात येते. कारण दिल्लीहून आलेल्या फोनकॉल वरती विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर दिले गेल्याने व मलकापूर नगरपरिषदेमार्फत केले जाणारे दैनंदिन घनकचरा प्रक्रिया व्यवस्थापन, रस्ते सफाई, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन योग्य होत असल्याची ही एक खरी पोहोच पावतीच आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. दिल्लीच्या स्वच्छ भारत अभियान कार्यालयातून शहराच्या स्वच्छतेबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देवून आपल्या शहराला अग्रस्थानी नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.
आमचं ठरलंय… पहिल्या दहामध्येच
स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची प्रत्यक्ष पाहणी जानेवारी महिन्यात होत असून, यावेळी नागरिकांना प्रत्यक्ष प्रश्न विचारून त्यांचा प्रतिसाद नोंदविला जाणार आहे. या प्रतिसादास स्वच्छ सर्वेक्षणाच्या 6000 गुणांपैकी 1300 गुण प्राप्त होणार आहेत. आमचं ठरलयं… पहिल्या दहा मध्येचं या घोषवाक्यानुसार प्रश्नावलीस सकारात्मक प्रतिसाद देवून मलकापूर शहरास उत्कृष्ट गुणानुक्रम प्राप्त करून द्यावे असे आवाहन मनोहर शिंदे यांनी केले आहे.