माळेगाव – माळेगाव हे उपनगर शिक्षण क्षेत्राबरोबरच उद्योग-व्यावसायामध्येही विकसित होत आहे. मात्र, या परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. याठिकाणी नेहमीच होणारे लहान-मोठे अपघात ही एक गंभीर समस्या बनली आहे. वेगाने धावणारी वाहने, रस्त्याचा उतार, गतिरोधकांचा अभाव, रस्त्याकडेला अस्ताव्यस्त उभी करण्यात येणारी वाहने, दुभाजकांचा अभाव, वाहनांची वाढती संख्या यामुळे परिसरामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेत ग्रामपंचायत प्रशासनाने सरकारी निधीची वाट न पाहता खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू केले आहे.
माळेगावातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यातच सतत पडणाऱ्या पावसामुळे ही माळेगावातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने अशा खड्ड्यांचा अंदाज रात्रीच्या वेळी येत नसल्याने वाहने यामध्ये आदळून अपघात होत आहेत. माळेगावातील अभियांत्रिकी महाविद्यालया शेजारी चिखलाचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात मोठे गाव म्हणून माळेगावला ओळखले जाते. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
येळे ढाळे वस्तीवरील स्थिती बिकट…
माळेगाव बु. येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना, शिवनगर ते येळे ढाळे वस्ती रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना आपली वाहने या खड्ड्यांमधून काढत जावी लागत आहेत. या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माळेगाव बु. ग्रामपंचायतीने हा रस्ताही लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कारखान्याकडे जाणारा रस्ताही उखडला….
माळेगावातून साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना येथे खड्ड्यातून वाहतूक करावी लागत आहे. या रस्त्यावर कारखान्याची सर्व अवजड वाहने तसेच याच मार्गावरून जात असल्याने वारंवार रस्ता उखडत असल्याने आता येथे रस्त्यांवरील खड्डयात पाणी साठून चिखल झाला आहे.