मुंबई – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साधून शिवसेनेची 25 वर्षे युतीत सडली असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व सोडले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे. फडणवीस यांनी गांधी कुटुंबाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमानाने अभिवादन करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्यासाठी एक ट्वीट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींकडून करुन दाखवा, असं ओपन चॅलेंज फडणवीस यांनी शिवसेनेला दिलं.
ज्यावेळी तुम्ही बाळासाहेबांच्या फोटोंना हार घालता त्याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते. तरी सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसता. यापेक्षा मोठी लाचारी काय ?, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.
दरम्यान शिवसेना भाजपासोबत सडली असं सांगता. पण भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर तुम्ही चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाले. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे, असा टीकाही फडणवीसांनी केली.