नवी दिल्ली – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येण्याबरोबरच सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 255 रुपयांनी वाढून 48,431 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कर्ज रोखयावरील परतावा वाढत आहे. या कारणामुळे गेल्या 15 दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. आजही त्यामध्ये वाढ झाली.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 80 रुपयांनी वाढून 64,793 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 18 पैशाने कोसळला. त्यामुळेही भारतीय सराफात सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून आले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,841 डॉलर व चांदीचा दर 24.25 डॉलर या पातळीवर गेला होता.
आगामी काळात महागाई वाढणार असल्यामुळे महागाईपासून संरक्षण करण्यासाठी बरेच गुंतवणूकदार सोन्याची खरेदी करीत असल्यामुळे जागतिक बाजारातही सोन्याचे दर वाढत आहेत. त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत. लघु ते मध्यम पल्ल्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता बऱ्याच विश्लेषकांनी व्यक्त केली.