पुणे – येथील डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात यावयाच्या “माणूस’कार श्री. ग. माजगावकर स्मृती पुरस्कारासाठी बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, ज्येष्ठ संस्कृतज्ज्ञ डॉ. श्रीकांत बहुलकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. अरुणा ढेरे यांनी दिली आहे. रोख 40 हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
श्री. ग. माजगावर यांची जन्मशताब्दी वर्ष 2029 मध्ये येत असून त्या पार्श्वभूमीवर सलग 11 वर्षे हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका विचारवंताला अथवा ज्ञानोपासकाला दिला जाणार आहे. या पुरस्काराची सुरुवात वर्ष 2019 पासून करण्यात आली असून यापूर्वी हा सन्मान न्या. नरेंद्र चपळगावकर (2019) आणि डॉ. शेषराव मोरे (2020) यांना मिळाला आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबद्दल सजग असणाऱ्या श्री. ग. माजगावकरांनी वर्ष 1961 मध्ये “माणूस’ साप्ताहिक सुरु केले. जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक निर्माण करण्यासाठी “माणूस’ चा प्रारंभ झाला. “समाजासहित आपली उन्नती साधा – अभिराष्ट्रेण वर्धताम’ हे “माणूस’चे ध्येयवाक्य होते.
आत्मनिर्भर राष्ट्रवाद आणि सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिकसमतावाद या दोन प्रेरणांचा समन्वय साधण्यासाठी विविध विचारधारांना माजगावकर खुल्या मनाने सामोरे गेले होते. त्यांच्या या कार्याची स्मृती अक्षय्य रहावी अशी या पुरस्कारामागची भावना असल्याने 11 वर्षे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले ज्येष्ठ लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांनी दिली आहे.