शिक्रापूर, (वार्ताहर)- शिवजयंती उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शिवरायांचे विचार अंगीकारुन सामाजिक उपक्रम राबवून या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपला पाहिजे असे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी व्यक्त केले.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने माहेर संस्थेत आश्रय घेत असलेल्या गरजू वंचितांना आम्ही मुस्लीम मावळे शिवरायांचे यांच्या वतीने मोठी वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सणसवाडीच्या सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, सिमाई आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सिमा पवार, द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान, तालुकाध्यक्ष शकील मनियार, उपाध्यक्ष विवेकानंद फंड, विश्वनाथ घोडके, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, सर्पमित्र शेरखान शेख, शिक्रापूर मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सिराज शेख, मौलाना मुबसीर सहाब, सामाजिक कार्यकर्ते फारूक तांबोळी, फिरोज सिकलकर, इम्रान तांबोळी, माहेर संस्थेचे व्यवस्थापक विजय सवर्णे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना मुस्लीम मावळ्यांनी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असून अशा उपक्रम समाजात राबवणे गरजेचे असल्याचे देखील गायकवाड यांनी सांगितले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान यांनी केले. माहेर संस्थेचे व्यवस्थापक विजय सवर्णे यांनी प्रास्ताविक केले. शकील मानियार यांनी आभार मानले.