कराड, (प्रतिनिधी) – स्वप्निल गणेश सुतार (वय 22, रा. पेठ वडगाव, जि. कोल्हापूर) या प्रवाशाचा खून केल्याप्रकरणी टेम्पोचालक संदीप शिवशंकराप्पा बुडगी (वय 31, रा. बावीकिरे, ता. नीलमंगला, जि. बेळगाव, सध्या रा. मुद्दापुरा, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी काल (दि. 21) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रवाशाकडील ऐवज लुटण्याच्या प्रयत्नात बुडगी याने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला होता.
याबाबत माहिती अशी, पेठ वडगाव येथील सोनार्ली वसाहतीत राहणारा स्वप्निल गणेश सुतार (वय 22) हा कामानिमित्त फेब्रुवारी 2019 मध्ये पुण्यात वास्तव्याला होता. बहिणीच्या लग्नासाठी पेठ वडगावला जाण्यासाठी तो निघाला होता. तो आपला मित्र करण बाबर याच्यासमवेत नवले ब्रिज येथे रात्री आला होता. तेथे कोल्हापूरकडे जाणार्या टेम्पोमध्ये स्वप्निलला बसवून, करण निघून गेला. टेम्पोचालक संदीप बुडगी याने तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यापासून 10-15 किमी अंतरावर टेम्पो उपमार्गावर थांबवला. तेथे त्याने स्वप्निलकडे पैशांची आणि किमती ऐवजाची मागणी केली.
स्वप्निलने नकार दिल्यानंतर चालक बुडगीने चिडून स्वप्निलचे हात चिकटपट्टीने बांधले. त्यानंतर चाकूने त्याच्यावर वार केले. स्वप्निलला टेम्पोतून उतरवून रस्त्यानजीक उसाच्या शेतात ओढत नेले. तेथे बुडगीने त्याला मारहाण केली. त्यावेळी स्वप्निलने आरडाओरडा केल्याने, बुडगीने त्याच्या गळ्यावर वार करून खून केला. स्वप्निलचा मृतदेह शेतात टाकून, बॅग आणि इतर किमती ऐवजासह तो टेम्पोमधून पसार झाला.
स्वप्निलचा मृतदेह 11 फेब्रुवारी 2019 रोजी शेतात आढळून आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी या गुन्ह्याचा तपास करून बुडगी याला अटक केली. बुडगी याच्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात 18 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये करण बाबर, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. डी. एल. कुराडे, डॉ. एस. जे. सावंत, तपासी अधिकारी अशोक क्षीरसागर यांच्या साक्षी महत्त्वापूर्ण ठरल्या.
सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद, पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपी संदीप बुडगीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक फौजदार ए. के. मदने, हवालदार दिलीप क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अर्चना पाटील, हवालदार सूर्यकांत खिलारे यांनी सहकार्य केले.