बारामतीत दोन कार्यालये असूनही दस्त नोंदणी केवळ अशक्य
बारामती (प्रतिनिधी) – येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला एजंटांचा विळखा पडला आहे. एजंटांच्या मदतीशिवाय येथे दस्त नोंदणी करणे सर्वसामान्यांसाठी केवळ अशक्य बनले आहे. खुलेआम पैशाची लूट केली जात असून, या कार्यालयातील अनागोंदीबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची ओरड नागरिक करत आहेत.
बारामती येथे दस्त नोंदणीचे प्रमाण अधिक असल्याने दुय्यम निबंधकांची दोन कार्यालये सुरू करण्यात आली आहेत; परंतु नागरिकांना येथे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. खासगी यंत्रणेकडूनच दस्त नोंदणी केली जात आहे. यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नसून, अधिकारी पैशाच्या मोहापायी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. या कार्यालयात एजंट स्वतः बसून दस्त स्कॅनिंगचे काम करतात.
दस्ताचे पेजिंग नियमानुसार या कार्यालयातील लिपिकाकडून होणे अपेक्षित असताना तेही या कामासाठी सामान्यांना वेठीस धरीत आहेत. सरकारने ऑनलाईन सेवा सुरू केली असली तरी त्याचा कोणताही फायदा सर्वसामान्यांना येथे होताना दिसत नाही. मर्जीतील एजंटांचेच दस्त प्राधान्याने नोंदविले जात आहेत. एजंटांनी आपली दुकानदारी येथे मोठ्या प्रमाणात सुरू ठेवली असून, कार्यालयाचा ताबाच त्यांनी घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
यापूर्वी या कार्यालयाचा सावळा गोंधळ पुढे आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथे कारवाई केली होती. त्यानंतर कामकाजात बदल होणे गरजेचे होते; परंतु त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. ऑपरेटरसुद्धा स्वतःच्या मर्जीतील लोकांचेच दस्त नोंदविताना दिसतात. त्यामुळे सर्वसामान्यांना दिवसभर बसून राहण्याची वेळ येते. मोठे बांधकाम व्यावसायिक, काही ठराविक वकील मंडळींनी येथे चांगलीच पट्टी पाडून ठेवली आहे. त्यांची कामे लागलीच होत आहेत. या कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत यापूर्वीही वरिष्ठांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु त्याची दखलच घेतली गेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सर्टिफाईड प्रतींसाठी दुप्पट पैशाची मागणी केली जात आहे. आम्ही दाखल केलेला दस्त फेटाळला जातो; परंतु तोच दस्त एजंटांकडून आला तर मात्र लगेच नोंदवला जातो. दस्ताची इंडेक्स आणि पावती लागलीच खातेदाराला देणे गरजेचे आहे; परंतु ती देखील दिली जात नाही.
– ऍड. नवनाथ भोसले, बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष, बारामती
बारामतीमध्ये दोन दुय्यम निबंधक कार्यालये आहेत आणि या दोन्ही ठिकाणी पुरेसा कर्मचारीवर्ग आहे. या ठिकाणी दस्तावेज नोंदवण्यासाठी स्वतः येणाऱ्यांची संख्या कमी आहे. वकील, स्टॅम्प व्हेंडर यांच्यामार्फतच कामे येथे अधिक होतात. दिवसभरात अधिकाधिक दस्तावेजांची नोंदणी येथे होत आहे.
– रवी डहाळे, दुय्यम निबंधक अधिकारी, बारामती