मुंबई :पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित स्वप्ना पाटकर यांना ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे. संजय राऊत यांना न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली असताना ईडीने स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवले. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर काही आरोपही केले आहेत.
मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. यापूर्वीही ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला होता. सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच आता स्वप्ना पाटकर यांच्या चौकशीनंतर संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांचीही ईडीने चौकशी केली होती. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती. आता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय खुलासा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.