मुंबई – ‘स्वातंत्र वीर सावरकर’ यांच्या जीवनाआधारित चित्रपट अभिनेता रणदीप हुड्डा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या चित्रपटातील रणदीपचा लुक समोर येताच अनेकांच्या पसंतीस पडला होता. मात्र आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रणदीप अभिनेत्यासह दिग्दर्शकाची देखील धुरा सांभळत आहे. यापूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र त्यांनी आता या चित्रपटातून माघार घेतली आहे. यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
रणदीप हुड्डाने या चित्रपटात अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. या कारणामुळे महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट सोडल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे. मांजरेकर म्हणाले की, “मी रणदीपला भेटलो तेव्हा तो खूप हुशार आहे हे मला कळलं. तो या प्रोजेक्टमध्येही खूप गुंतला होता. आमच्या अनेक मीटिंग्स झाल्या. त्यानं या विषयावर आधारित अनेक पुस्तके वाचली होती. मी त्याची आवड पाहिली. त्यानं पहिला ड्राफ्ट वाचून दाखवला ज्यात त्याला खूप बदल हवे होते. पण मग त्यानंतर दुसऱ्या ड्राफ्टमध्ये देखील त्यांना बदल हवे होते. यामुळे या चित्रपटाला अडचण येईल, असेही मी त्याला सांगितले होते. एकदा स्क्रिप्ट फायनल झाल्यावर तो मला कोणतेही प्रश्न विचारणार नाही असे त्यानं आश्वासन दिले होते की तो माझ्या कामात अडथळे आणणार नाही.”
पुढे ते म्हणाले, ‘रणदीपच्या स्वतःच्या काही कल्पना होत्या, ज्या त्याला स्क्रिप्टमध्ये पाहिजे होत्या. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. मला वाटले की तो मला चित्रपट कसा बनवायचा हे सांगत आहे. मी माझ्या पद्धतीने दिग्दर्शन करणार असल्याचे स्पष्ट केले. मला पुन्हा जाणवले की तो मला काम करू देत नाही. मी निर्मात्यांना भेटलो. मी त्याला सांगितले की जर आम्ही दोघे या चित्रपटाचा भाग असू तर हा चित्रपट बनणार नाही. त्यामुळे एकतर मी चित्रपटात असेल किंवा रणदीप, निर्मात्यांना आता कळत असेल की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला.’
दरम्यान, रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात आला होता. यात रणदीप काळी टोपी, चष्मा अशा सावरकरांच्या खास वेशभूषेत दिसत होता. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवर वेगवेगळ्या ठिकाणी होणार असल्याचे म्हंटले जात आहे.