Swatantrya Veer Savarkar Box Office । बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट काल 22 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे आणि अमित सियाल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
अहवालानुसार,चित्रपटाने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) केवळ 1.15 कोटी रुपयांचे अंदाजे कलेक्शन केले आहे. मात्र, अंतिम डेटा जाहीर झाल्यानंतर ‘या’ आकड्यात थोडे बदल होऊ शकतात. सद्य:स्थितीत 1.15 कोटींचे संकलन चांगले म्हणता येणार नाही. मात्र, शुक्रवारी 1 कोटींहून अधिक कमाई करण्यात यश आले असले तरी शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे संकलनाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Swatantrya Veer Savarkar Box Office । रणदीपने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे…
या चित्रपटात रणदीप हुड्डा विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारताना दिसत आहे. मुख्य भूमिका करण्यासोबतच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.यातून त्याने दिग्दर्शनाच्या जगातही प्रवेश केला आहे. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे दिसली आहे. तिने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित आणि संदीप सिंग यांनी केली आहे.
मात्र, या चित्रपटासाठी रणदीपने स्वत:ला ज्याप्रकारे बदलून टाकले त्यामुळे तो खूप चर्चेत आला. या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपने स्वत:ला त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावून घेण्यासाठी 26 किलो वजन कमी केले. त्याने कमी वजनातील फोटोही सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले होते, जे व्हायरल झाले होते. दरम्यान, अभिनेता दिव्येंदू शर्माचा ‘मडगाव एक्स्प्रेस’ हा चित्रपटही २२ मार्चला प्रदर्शित झाला होता.चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 1.50 कोटी रुपयांचा (अंदाज) व्यवसाय केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल खेमूने केले आहे.