महापौरपदासाठी “महाशिवआघाडी’?

विरोधी पक्षांचे संकेत : पुण्यातही भाजपला घेरण्याचा प्रयत्न
पुणे – राज्यात होऊ घातलेल्या सत्तासमीकरणाचा परिणाम पुण्यातील महापौरपदाच्या निवडणुकीतही होण्याची शक्‍यता आहे. महाआघाडीसोबत शिवसेना सत्ता स्थापन करण्याची तयारी करत असल्याने महापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना तसेच मनसे एकत्र येण्याची शक्‍यता आहे. यावर निर्णय घेण्यासाठी या पक्षांच्या नेत्यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. पण, ही चर्चा पुढे जाऊ शकते, याबाबतचे संकेत विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

महापौर तसेच उपमहापौर पदासाठी येत्या शुक्रवारी निवडणूक होणार आहे. महापालिकेत 99 नगरसेवक असलेल्या भाजपची एकहाती सत्ता आहे. महाशिवआघाडी झाली, तरी या आघाडीची सदस्यसंख्या 63 होते. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार असे चित्र आहे. पण, त्यातही विरोधकांनी मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी युती नसल्याने शिवसेनेने महापालिकेत भाजपच्या निर्णयांना विरोधही केला होता. मात्र, लोकसभेसाठी युती झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष महापालिकेत एकत्र होते. विधानसभा निवडणूक निकालापर्यंत ही युती कायम होती. मात्र, आता सत्तास्थापनेचा तिढा वाढल्याने भाजप आणि शिवसेनेने अनौपचारिक काडीमोड घेतला आहे. त्याचा परिणाम महापौर निवडीवर होणार आहे. पुण्यात भाजपचे बहुमत असले, तरी विरोधकांनी एकत्र येत भाजपविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. तर, अवघे 10 नगरसेवक असले, तरी ही महाशिवआघाडी झाल्यास भाजपला डिवचण्यासठी महापौर अथवा उपमहापौरपदाचा उमेदवारपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला संधी दिली जाण्याची खेळीही केली जाऊ शकते.

भाजपच्या नाराज गटावरही लक्ष
महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच भाजपमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच शहरातील भाजपमध्ये दोन गट आहेत. त्यामुळे आपल्या गटाला महापौरपद मिळावे, यासाठी हे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. त्यामुळे संधी न मिळाल्यास काही नगरसेवक मतदानाला वैयक्तिक कारण देऊन अनुपस्थित राहण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे पदाधिकारी या हालचालीवर लक्ष ठेऊन आहे. मात्र, भाजपकडे जवळपास 35 मते अधिक असल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेतील पक्षनिहाय बलाबल

Leave A Reply

Your email address will not be published.