मुंबई – ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याचा आरोप राज्याचे मंत्री अनिल परब यांनी केला आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी सदावर्ते हेच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला.
एसटी आंदोलनातील आंदोलकांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऍड. गुणरत्न सदावर्ते, ऍड. जयश्री पाटील, पैसे जमा करणारा औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी ही तक्रार केली होती.
दरम्यान, आज पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘सदावर्ते यांनी सुनियोजित पद्धतीने चिथावणीखोर भाषणे देऊन सिल्व्हर ओकवर हल्ला घडवून आणला. त्यांची पोलिस कोठडी आज दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. मात्र सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, हल्ला ज्या दिवशी घडला त्या दिवशी सदावर्तेंना व्हॉटसअॅपवर दोन कॉल आले होते. ते दोन्ही कॉल नागपूरवरून आले होते.
त्यामुळे, माझा अंदाज होता की सदावर्ते हा मोहरा आहे. मात्र सदावर्तेचा मास्टरमाईंड कुठे लपून बसला आहे. याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. असं म्हणत मिटकरींनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.