मुंबई : राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबै बँकेच्या निवडणुकीत ‘बोगस’ मजूर प्रकरणी दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबै बँकेच्या निवडणुकीत ‘बोगस’ मजूर प्रकरणी एवढ्या वर्षांपासून तपास सुरूच आहे? त्यामुळे कस्टडीची गरज नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, प्रवीण दरेकरांना जामीन मंजूर होणं म्हणजे, दरेकरांविरोधात चौकशी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजाराच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची दोन वेळा चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची चौकशी झाली होती. दरेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचं त्यांनी म्हटले होते. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
तर, उच्च न्यायालयात सरकार तोंडघशी पडणार असल्याचा दावा दरेकर यांच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे उच्च न्यायालय दरेकरांना दिलासा देणार की, अटकपूर्व जामीन फेटाळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अशातच सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने दरेकरांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.