मुंबई – बदली (transfer) झालेली असताना मिळालेल्या ठिकाणी रुजू न होता मनासारख्या ठिकाणी बदलीचा हट्ट धरणाऱ्या सात तहसीलदार आणि चार उपजिल्हाधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे.
मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने तब्बल 30 उपजिल्हाधिकाऱ्यांनी गेली दोन महिन्यापासून पोस्टिंग स्वीकारली नव्हती. यातील बरेचसे अधिकारी मंत्रालय आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये फेऱ्या मारत होते. अधिकारी कामावर रुजू न झाल्याने त्या विभागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यांना दिलासा देण्यासाठी अनेक ठिकाणी प्रशासन कमी पडताना पाहायला मिळत होते. (maharashtra revenue department)
जे महसूल अधिकारी बदली होऊनही त्या ठिकाणी अद्यापही रुजू झाले नाहीत अशा सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करत विभागीय आयुक्त पातळीवर चौकशी करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार अकरा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
निलंबनाची कारवाई झालेले उपजिल्हाधिकारी (sub district officers) –
उपजिल्हाधिकारी पदाच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंह मोहिते यांचा समावेश आहे. तर इतर दोन उपजिल्हाधिकाऱ्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
निलंबनाची कारवाई झालेले तहसीलदार (tehsildar) –
बदली झाली असतानाही वेळेत रुजू न झालेल्या 7 तहसीलदारांना निलंबित केले आहे. यामध्ये बी. जे. गोरे (एटपल्ली, गडचिरोली), सुनंदा भोसले (नागपूर), पल्लवी तभाने (वर्धा), बालाजी सूर्यवंशी (अपर तहसीलदार, नागपूर), सरेंद्र दांडेकर (धानोरा, गडचिरोली), विनायक थविल (वडसादेसागंज, गडचिरोली), तर नाशिक विभागातील सुचित्रा पाटील (करमणूक शुल्क अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जागा रिक्त असायच्या अधिकारी हजर होत नव्हते. पहिल्यांदा आपण या दोन्ही ठिकाणी 100 टक्के जागा भरल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी एका जिल्ह्यात अनेक वर्ष मनमानी सेवा केली. जी मक्तेदारी अशा अधिकाऱ्यांनी निर्माण केली होती, ती आपण मोडीत काढत आहोत. अधिकाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे अन्यथा निलंबनाची कारवाई सुरू होईल, असा इशारा महसूलमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर 30 पैकी 19 अधिकरी आपल्या जागेवर रुजू झाले. उर्वरीत बदली केलेले 11 अधिकारी रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच आली आहे.
असे आहेत बदलीचे नियम –
एखाद्या अधिकाऱ्याची तो जिल्ह्यात कार्यरत आहे त्याच जिल्ह्यात बदली झाली असेल तर तीन दिवसात त्याला कर्तव्यावर हजर राहणे बंधनकारक आहे. तर जिल्ह्याबाहेर बदली झाली असेल तर सात दिवसात बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागते. काही कारणास्तव जर अधिकारी नियमीत वेळेत बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. पर्याप्त कारण असेल तर विभाग ते ग्राह्य धरते आणि पर्याप्त कारण नसेल तर कारवाई केली जाते. या नियमानुसार महसूल विभागाने अनेकदा या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आल्याची माहिती माहिती समोर आली आहे. त्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.