श्रीहरिकोटा – इस्रोची ( ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. पण भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अंतराळ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की चंद्रयान-3 चे लॅंडर (Vikram lander) आणि रोव्हर 23 सप्टेंबरला पुन्हा सक्रिय होऊ शकतात. असे झाल्यास चंद्रयानचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील अधिक प्रायोगिक डेटा इस्रोला मिळू शकेल.
इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई ( Director of ISRO Space Application Centre Nilesh Desai) म्हणाले, ‘3 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र पडल्याने चांद्रयान-3 चे लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांना स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले होते. लॅंडर आणि रोव्हरवर सोलर पॅनल बसवण्यात आले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दिवस आल्यावर ते रिचार्ज करता येतात.
आमच्या योजनेनुसार, लॅंडर विक्रम आणि रोव्हर 23 सप्टेंबर रोजी पुनरुज्जीवित केले जाऊ शकतात. चंद्रावर आता दिवस सुरू झाला आहे. तथापि, चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान रात्री उणे 120 ते उणे 200 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्यावर सौर पॅनेल पुन्हा योग्य प्रकारे कार्य करू शकतील की नाही हे पाहणे बाकी आहे.