खालापूर, (वार्ताहर) – खालापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘परिसर भेटीत परसबागेला भेट दिली. यावेळी फळभाज्यांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या.
शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षातून परिसर भेट अपेक्षित धरली आहे. खालापूर मधील शेतकरी राजीव मुळेकर त्यांच्या परसबागेत असलेल्या विविध भाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, वरिष्ठ विस्तार अधिकारी शिल्पा दास, सहशिक्षिका सारिका गोळे, राजश्री राक्षे, नितीन भावे, ग्रामस्थ राजन क्षीरसागर, रंजना जगताप याप्रसंगी उपस्थित होते.
दुधी भोपळा, पडवळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कारले, वांगी, पपई, पेरू, चिकू यांची लागवड कशी केली जाते याची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. तर विद्यार्थ्यांनी त्यांना शाळेमध्ये शिकवत असलेली अनेक गाणी, पोवाडे तोंडपाठ म्हटले.
तहसीलदार तांबोळी यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांना भविष्यात काय व्हायचे आहे, हे जाणून घेतले. शाळेने फक्त कागदावर परिसर भेट न दाखवता प्रत्यक्ष जागेवर जाऊन विद्यार्थ्यांना अनुभव देत आहेत हे पाहून आनंद वाटल्याचे ते म्हणाले.