मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याला वेग दिला आहे. या कारवाईत एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यास त्यांच्या जागी अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व नितीन गडकरी (Nitin Gadkari )यांची नियुक्ती करण्याच्या मुद्यावर भाजपमध्ये मोठा खल सुरू असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यात विलंब केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने त्यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.
पक्षांतर्गत बंदी कायदा व संविधानातील 10 व्या परिशिष्टानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 16 आमदार अपात्र ठरल्यास शिंदे – फडणवीस सरकारला मोठा धक्का बसू शकतो. असे झाले तर राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या गोटात यासंबंधीची रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंवर अपात्रतेची कारवाई झालीच तर भाजप विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करेल. एवढेच नाही तर भाजपमध्ये या पदासाठी देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर यासंबंधीचे पत्ते उघड केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.
शिंदेंचे राजकीय पुनर्वसनही महत्त्वाचे?
दुसरीकडे, एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आमदार अपात्र ठरल्यास भाजप त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करणार? असा प्रश्नही या प्रकरणी विचारला जात आहे. यापूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच कायम राहतील असे नमूद करत यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता. पण आता शिंदे अपात्र झाल्याच्या स्थितीत फडणवीस कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर आठवड्याभरात सुनावणी घेऊन प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कामाला लागले आहेत. नार्वेकर गुरुवारी तातडीने दिल्लीला जावून कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नार्वेकर कुणाला भेटणार? दिल्लीत कोणती सल्लामसलत होणार? व पुढील आठवडा चांगलाच गाजणार असल्याची गरमागरम चर्चा रंगली आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आपल्या दिल्ली दौऱ्यात ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. तर सूत्रांनी कायदे तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ते आमदार अपात्रतेसंबंधीचा आपला निर्णय देतील असा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नार्वेकर यांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याचाही दावा केला जात आहे.
दुसरीकडे, नार्वेकर पुढील 1-2 दिवसांत अपात्रतेशी संबंधित सुनावणीसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार ते आठवड्याभरात हा मुद्दा निकाली काढण्याच्या विचारात असल्याचा दावाही केला जात आहे.
शिंदे गटाचा बाजू भक्कम
शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्यावर आपल्या पक्षाची बाजू बळकट असल्याचा दावा केला आहे. आम्हाला पुढील एक-दोन दिवसांत नोटीस मिळण्याची शक्यता आहे. आम्ही त्याला उत्तर देऊ. आमची बाजू दुबळी नाही तर भक्कम आहे, असे ते म्हणाले. अध्यक्ष राहुल नार्वेकर कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जात आहेत. ते त्यांच्या निर्देशांनुसार आपली कारवाई करतील. यापूर्वी त्यांनी 2 आठवड्यांची मुदत दिली होती. पण सध्या थोडीशी घाई आहे. पण या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.