पाचगणी – जागतिक दर्जाची थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीला देश- विदेशातून लाखो पर्यटक भेट देतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना नाहक त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने दि. 7 ते 25 जून दरम्यान दर शुक्रवार, शनिवार, रविवार यादिवशी प्रायोगिक तत्त्वावर काही बदल सुचवले आहेत.
या बदलाबाबत जनतेच्या हरकती व सूचना असल्यास त्यांनी त्या हरकती वळीीींरषषळल.ीरींरीरारहरिेश्रळलश.र्सीें.ळप या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. त्यानंतर त्यांचा सांगोपांग विचार करून अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.
दि.7 ते 25 जून दरम्यानच्या दर शुक्रवार, शनिवार व रविवारसाठी वाहतुकीतील बदल असे : मुंबई- पुणे बाजुकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहने सुरुर फाटा – वाई- पाचगणी- महाबळेश्वर (एकूण 48 किलोमीटर) कडे जातील. तर पाचगणी बाजुकडून पुणे- मुंबईकडे जाणारी वाहने संजीवन विद्यालय, पाचगणी – रुईघर- महू डॅम रोडने- करहर- कोळेवाडी- कुडाळ- पाचवड फाटा मार्गे महामार्गावरुन पुढे जातील. त्यामुळे थंड हवेची मजा लुटून पुन्हा पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या पर्यटकांना आता पाचगणी, वाई, सुरूर फाटा या मार्गाचा वापर करता येणार नाही. तर महाबळेश्वर बाजूकडून पुणे – मुंबईकडे जाणाऱ्या पर्यटकांनी मेढा, कुडाळ- पाचवड फाटा अथवा मेढा- सातारा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
महाबळेश्वर बाजुकडून कोल्हापूर व कोल्हापूर, सातारा बाजुकडून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी मेढा- महाबळेश्वर या मार्गाचा वापर करता येईल. महाबळेश्वर बाजुकडून पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पाचगणी मार्गे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना लिंगमळा- भेकवली मार्गे महाबळेश्वर- मेढा रोडवरील लिंगमळा फाटा- मेढा- कुडाळ- पाचवड फाटा मार्गे वळविण्यात येणार आहे. या वाहतूक मार्गातील बदलांची नोंद घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.