नवी दिल्ली – ओडिशा रेल्वे अपघातानंतर कॉंग्रेसकडून सरकारवर टीका केली जाते आहे. पक्षाकडून सरकारला काही प्रश्नही विचारण्यात आले. त्यानंतर एका कॉंग्रेस नेत्याने असा दावा केला की या दुर्घटनेनंतर अनेक प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केले आहे. लोक रेल्वेने प्रवास करायला घाबरत आहेत. मात्र त्यांचा हा दावा आयआरसीटीसीने फेटाळला आहे.
हजारो लोकांनी आपले तिकिट रद्द केले आहे. गेल्या बऱ्याच काळात इतकी भीषण दुर्घटना घडली नव्हती असे म्हणत कॉंग्रेस नेते भक्तचरण दास यांनी व्हिडिओ ट्वीट केला आहे. रेल्वेचा प्रवास आता सुरक्षित राहीला नसल्याची लोकांची भावना झाली असल्याचेही ते म्हणाले.
तथापि, रेल्वे तिकिट बुकींगचे काम पाहणाऱ्या आयआरसीटीसीने मात्र हे दावे फेटाळत आकडेवारीच सादर केली आहे. 1 जून 2023 रोजी म्हणजे अपघाताच्या एक दिवस अगोदर तिकीट रद्द करण्याचे प्रमाण 7.7 लाख होते. तर 3 जून 2023 रोजी म्हणजे अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिकिट रद्द होण्याचे प्रमाण 7. 5 लाख होते असे त्यांनी नमूद केले आहे.