Mohan Yadav : मध्य प्रदेशमध्ये बुधवारी मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल मंगूभाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्या कार्याचा पदभार स्वीकारताच त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्यास मुख्यमंत्र्यांनी बंदी घातली आहे. राजधानी भोपाळमध्ये झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.
मोहन सरकारने सर्व धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाज निर्धारित डेसिबलपर्यंत मर्यादित करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लाऊडस्पीकर तपासण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पथके तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हा प्रशासनाने नामनिर्देशित केलेले अधिकारी, संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी आणि प्रादेशिक अधिकारी किंवा प्रदूषण मंडळाचे अधिकारी असणार आहेत.
या आदेशानुसार आवाजाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. तसेच आदेशात दिलेल्या सूचनांचं पालन न केल्यास सरकाराच्या वतीने कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मोहन यादव यांनी घेतलेल्या पहिल्याच निर्णयात त्यांनी लाऊडस्पीकर विरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
कोण आहेत मोहन यादव?
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली होती.