सातारा – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असलेली लावणी कलाकार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. ‘गौतमी पाटील तिच्या डान्समधून अश्लीलता पसरवतेय आहे’ त्यामुळे तिचे कार्यक्रम बंद करा असं अनेक ठिकाणी बोललं जात आहे. तर दुसरीकडे लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या ह्याच लावणी कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र, आता हाच धागा पकडून लावणी कलाकार ‘माधुरी पवार’ हिनं देखील गौतमी पाटीलच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच गौतमीचा चांगलाच समाचार देखील घेतला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत माधुरी बोलत होती. यावेळी माधुरी पवार म्हणाली, “एका कलाकारानं दुसऱ्या कलाकारावर लांच्छन करू नये. जे काही बाहेर चाललंय त्यातून कलेचं विभत्स रूप दिसतं. आहे. मला माझ्या बाबांकडून नृत्याचे धडे मिळालेत. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन शिकले. अनेक ट्राफीज जिंकल्या.
हे सर्व एका दिवसात कमविलेलं नाहीय. खूप दिवस काम केल्यानंतर माणसाच्या मनात कलाकाराच्या कलेचा रिस्पेक्ट येतो. फेमस होणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, सध्या गौतमी पाटील यांच्याकडून जे नृत्य केलं जात आहे. ते पूर्णपणे चुकीचं असून, लवकरात-लवकर तिच्या कार्यक्रमावर बंदी घालावी’. अशी मागणी माधुरी पवार हिने केली आहे.