Madha Lok Sabha Election : राज्यात सुरुवातीपासून चर्चेत असलेला माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा अखेर सुटला आहे. महायुतीकडून भाजपने रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना उमेदावारी जाहीर केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून येथे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आला नव्हता. महाविकास आघाडीच्या जागावाटप फाॅर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाट्याला आला आहे. आता येथून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या 14 एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून 16 एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील, अशी लढत होणार आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिल्यानंतर त्याला धैर्यशील मोहिते पाटलांनी विरोध केला होता. भाजपने माढ्यातील उमेदवार बदलावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण भाजपने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. या दरम्यान मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्याचा भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, माढा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे.