Vijay Vadettiwar । Lok Sabha Election 2024 – काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठे खिंडार पडणार असल्याचा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. काँग्रेसमधील मोठे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांचा उजवा हात असलेले विजय वडेट्टीवार देखील लवकरच पक्षाला रामराम ठोकणार आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना राज्यसभेची जागाही मिळाली.
त्यानंतर नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे भाजपमध्ये आले. आता लवकरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील भाजपमध्ये येतील. त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली आहे. या चर्चांचा मी साक्षीदार असल्याचा दावाही आत्राम यांनी केला आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी आत्राम यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसमध्ये आहे आणि येथेच राहणार आहे. धर्मरावबाबा आत्राम हे खोटं बोलत आहेत. त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, त्यातून सत्य बाहेर येईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
धर्मरावबाबा आत्राम हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर आत्राम यांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे. त्यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा लढवण्याची इच्छा होती, मात्र हा मतदारसंघ वाटाघाडीत भाजपच्या वाट्याला गेला. तिथे अशोक नेते हे महायुतीचे उमेदवार आहेत.