नवी दिल्ली – करोना महामारीनंतर जगभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा फटका सामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील चलनांच्या खरेदीनुसार भारतातील एलपीजीची प्रति लिटर किंमत जगात सर्वाधिक आहे.
देशातील किंमत 3.5 आंतरराष्ट्रीय डॉलर प्रति लिटर आहे. भारतानंतर तुर्की, फिजी, मोल्दोव्हा आणि युक्रेनमध्ये एलपीजीची सर्वाधिक किंमत आहे. दुसरीकडे, स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅनडा आणि यूकेमध्ये एलपीजीची किंमत आंतरराष्ट्रीय डॉलरपेक्षा कमी आहे.
पेट्रोलची किंमत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय डॉलरच्या दृष्टीने पेट्रोलच्या किमतीवर नजर टाकल्यास भारतात ती प्रति लिटर 5.2 आंतरराष्ट्रीय डॉलरवर आहे. ही किंमत अमेरिकेत 1.2 आंतरराष्ट्रीय डॉलर, जपानमध्ये 1.5, जर्मनीमध्ये 2.5 आणि स्पेनमध्ये 2.7 आंतरराष्ट्रीय डॉलर इतकी आहे. म्हणजेच या देशांमध्ये पेट्रोलचे दर भारताच्या तुलनेत खूपच कमी आहेत.
डिझेलची किंमत जगाच्या तुलनेत भारत आठव्या क्रमांकावर आहे. भारतात किंमत 4.6 आंतरराष्ट्रीय डॉलर आहे. जगातील सर्वात महाग डिझेल सुदानमध्ये आहे. तेथे त्याची प्रति लिटर किंमत 7.7 आंतरराष्ट्रीय डॉलर आहे. त्यानंतर अल्बानिया, तुर्की, म्यानमार, जॉर्जिया, भूतान आणि लाओस यांचा क्रमांक लागतो. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेच्या तुलनेत पाश्चात्य देशांमध्ये डिझेल खूपच स्वस्त आहे.