लंडन – चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिदने आपली आगेकूच कायम राखताना चेल्सीचा 3-1 असा पराभव केला. या विजयात मोलाचा वाटा उचलताना रेयालच्या करीम बेन्झेमा याने अफलातून हॅट्ट्रिक साकार केली. यंदाच्या स्पर्धेत बेन्झेमाची ही सलग दुसरी हॅट्ट्रिक आहे. या विजयाच्या जोरावर रेयालने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
यंदाच्या स्पर्धेच्या मोसमात बेन्झेमाने आतापर्यंत 36 सामने खेळताना तब्बल 37 गोल केले आहेत. त्याने पॅरिस सेंट जर्मेनविरुद्ध (पीएसजी) झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात हॅट्ट्रिक केली होती. चेल्सीविरुद्ध झालेल्या शुक्रवारच्या लढतीत बेन्झेमाने 21, 24 व 46 व्या मिनिटाला गोल केले. चेल्सीकडून एकमेव गोल केय हॅवर्टझने 40 व्या मिनिटाला केला.
अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात व्हिलारेयालने सहा वेळच्या विजेत्या बलाढ्य बायर्न म्युनिकचा 1-0 असा पराभव केला. व्हिलारेयालने तब्बल 16 वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या लढतीतील एकमेव गोल पहिल्या सत्रात आरनॉट डांजुमाने केला. चॅम्पियन्स लीगमधील गेल्या 30 सामन्यांमधील बायर्नचा हा केवळ दुसरा पराभव आहे.