LPG Cylinder Price| आज 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. आज 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. यामुळे आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त झाल्याने काही प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. हे नवे दर आजपासून सर्वत्र लागू होणार आहेत.
तीन महिन्यानंतर दिलासा
एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मागील तीन महिन्यापासून वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले. मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 14 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याशिवाय जानेवारी महिन्यातही एलपीजी सिलेंडर 1.50 रुपयांनी महागला होता. आता तीन महिन्यानंतर एलपीजी स्वस्त झाला आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर
त्यानुसार आता दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाली असून आता तो येथे 1879 रुपयांना मिळणार आहे. मुंबईमध्ये एका सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये झाली आहे तर चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपये झाला आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 1795 रुपये, कोलकात्यात 1911 रुपये, मुंबईत 1749 रुपये आणि चेन्नईमध्ये 1960.50 रुपयांना मिळत होता.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल नाही
यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने ग्राहकांना 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरवर मोठा दिलासा दिला होता. यानंतर घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली. सध्या या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यानुसार, सिलिंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.
हेही वाचा:
फक्त दोनशे जागांचा आकडा पार करून दाखवा.! ममता बॅनर्जी यांचे भाजपला थेट आव्हान