पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने 87 हजार हेक्‍टरचे नुकसान

सातारा  -अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राचा साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्राला प्राथमिक अंदाजानुसार साडेसहाशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत 87 हजार 416 हेक्‍टर पिकांचे नुकसान झाले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात नुकसानीचे हे आकडे समोर आले आहेत. अतिवृष्टीने पशुधनाचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. या पावसात सोलापूरमध्ये 829, पुणे जिल्ह्यात 153, सातारा जिल्हयात 11, सांगलीत 28 जनावरांचा मृत्यू झाला. वित्तहानी प्रवर्गात पुणे जिल्ह्यातील एकूण 365 घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. यामध्ये शंभर झोपड्यांचा समावेश आहे.

पिकांच्या नुकसानीचा आकडासुद्धा मोठा असल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. पुणे जिल्ह्यात 18476 हेक्‍टर, सांगलीत 4276 हेक्‍टर, कोल्हापूरमध्ये 2350 हेक्‍टर तर साताऱ्यात 1420 हेकटरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवालातील प्राथमिक अंदाज आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने भात, सोयाबीन, भाजीपाला,  बाजरी, ज्वारी, द्राक्षे, भुईमूग यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

पाच जिल्हयात अतिवृष्टीने झालेल्या या नुकसानीचा आकडा साधारण साडेसहाशे कोटीचा असल्याचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्यात माण तालुक्‍यातील सर्वाधिक 510 हेक्‍टरवरील ज्वारी व मका पिकाचे नुकसान झाले आहे. फलटण तालुक्‍यात 390 हेक्‍टर, सातारा तालुक्‍यात 60, कोरेगाव तालुक्‍यात सोयाबीन व आले पिकांचे 120 हेक्‍टर, पाटण तालुक्‍यात भात पिकाचे दोनशे हेक्‍टर

खटाव तालुक्‍यात कांदा व बटाटा पिकाचे 70 हेक्‍टर, खंडाळा तालुक्‍यात 5 हेक्‍टर, वाई तालुक्‍यात भात व सोयाबीन पिकाचे 15 व महाबळेश्‍वर तालुक्‍यात भात पिकाचे तीस हेक्‍टर असे 1420 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयात 2350 हेक्‍टरवरील भात व सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीसह पुढील रब्बी हंगामही अडचणीत आला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातून पाण्याचा मोठया प्रमाणावर विसर्ग वाढल्याने पंढरपूर शहराला पुराचा विळखा पडला. गेल्या दोन दिवसांत 17 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.

परतीच्या पावसाचा कालावधी वाढला
परतीच्या मान्सूनचा काळ साधारण ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत अपेक्षित असतो. मात्र अलीकडच्या तीन वर्षात पावसाचा जोर अगदी नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल्याचे दिसून आले आहे. मान्सूनचे बदलते स्वरूप, पृथ्वीचे बदलते चुंबकीय क्षेत्र व वाढते तापमान यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात तीव्र दाबाची क्षेत्रे तयार होत असल्यामुळे बदल घडत असल्याची माहिती हवामान विभागाची सूत्रांनी दिली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.