पुणे जिल्हा: जेवणातूनच प्रतिकारशक्ती वाढवा

गेल्या दोन महिन्यांपासून अन्न पाकिटे पुरवण्याचे काम अखंड सुरू

Madhuvan

मिलन म्हेत्रे

पुणे – करोना झाला म्हणून काय झालं… औषधं तर चालू आहेतच; पण त्याचबरोबर तुमचे खाणंही तितकेच चांगलं असलं पाहिजे आणि खाल्लं तरच औषधांचा त्रास होणार नाही… ऍसिडिटी वाढणार नाही… दिलेला नाष्टा, चहा, दूध, जेवण वेळेवर घ्या… दोन घास व्यवस्थित खा, तरच अंगात ताकद राहील आणि तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल…, कोविड सेंटरमध्ये भरती झालेल्या रुग्णांना त्यांच्या आरोग्याबरोबरच योग्य आहाराबाबत प्रबोधन बचत गटाच्या महिलांकडून प्रबोधन केले जाते आहे.

पुणे जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्‍यांमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर प्रभावी उपचार होत आहेत. अनेक रुग्ण बरे होत आहे; पण या सगळ्यात त्यांच्या आहारावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे आणि त्यातच बचत गटाच्या महिलांचे यात फार मोठे योगदान आहे. आपल्याला करोना झाला आहे, या भीतीनेच येथे येणाऱ्या रुग्णांवर मानसिक दडपण येत आहे. या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये अनेक बचत गटांच्या माध्यमातून करोना रुग्णांना काढ्यापासून आहारापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवले जात आहेत. सर्दी, खोकला, ताप यामुळे या रुग्णांची तोंडाची चव गेलेली असते. त्यातच त्यांना देण्यात येणाऱ्या औषधांमुळे ऍसिडिटीचाही त्रास अनेकांना होतो आहे. अशावेळी जेवणावरची वासना कमी होत आहे.

मात्र, भरपूर जेवले आणि वेळेत औषधे घेतली तर करोनावर मात करणे सहज शक्‍य आहे, हे वेळोवेळी आरोग्य विभागाकडूनही सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये अन्नपुरवठा करणाऱ्या बचत गटाच्या महिला अन्नाची पाकिटे पोहोचवताना या रुग्णांना आधार देण्याचे त्यांना दिलासा देण्याचेही काम मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत.

गेले दोन महिने मंचरला कोविड सेंटरमध्ये जेवणाची पाकिटे बचत गटाच्या माध्यमातून देण्यात आली आहेत. करोना रुग्णांना ही पाकिटे पाठवत असताना बचत गटाच्या महिलांना कोणत्याही प्रकारचे पीपीइ कीट वगैरेंचा पुरवठा करण्यात आला नाही; पण येथील महिलांना या काळात रेनकोटचा वापर केला आणि कोविड सेंटरला जेवणाचे डबे आणि नाष्टा पुरवला आहे; पण या रुग्णांना जेवणाबरोबरच आधाराची गरज आहे, ती भूमिकाही बचत गटाच्या महिलांना पार पाडली आहे.
अरुणा टेके, अध्यक्ष, रेणुकामाता महिला बचत गट, मंचर

रांजणगाव कोविड सेंटरला दोन महिन्यांपासून नाष्टा-जेवण देत आहेत. पार्सल बनवण्यासाठी चहाचे कप, जेवणाचे डबे यांचा निचरा होतील, असेच वापरण्यात येत आहेत. या सगळ्याचा खर्च मिळून प्रतिव्यक्ती दिवसाला 130 ते 140 रुपये येत आहे. घरगुती पद्धतीने हे काम सुरू असून, अत्यंत सकस आणि पोष्टिक अन्न रुग्णांना दिले जात आहे. अन्नाची पाकिटे कोविड सेंटरच्या गेटवर दिली जातात आणि त्यानंतर ती रुग्णांपर्यंत पोहोचवली जात आहेत.
– वैशाली नवले, स्वरांजली महिला बचत गट, कोरेगाव (ता. शिरूर)

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.