सोलापूर ( PM Modi in Solapur ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी सोलापुरातील कुंभारी येथील रे नगर प्रकल्पातील असंघटित कामगारांच्या घरकुलांचे लोकार्पण पार पडले. आज झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण केले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींच्या महिन्यातील दुसऱ्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका केली आहे.
आदरणीय मोदीजी आज राज्यात आहेत, राज्यातले मोदी साहेबांचे वाढते दौरे बघता मागील काळात आलेले सर्व्हे भाजपने चांगलेच गांभीर्याने घेतलेले दिसतात आणि त्यासाठीच पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा यांसारखे साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा… pic.twitter.com/P7KSRYgrg7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर | PM Modi in Solapur
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चालू महिन्यातील हा दुसरा महाराष्ट्र दौरा ठरला. यापूर्वी त्यांनी १२ जानेवारीला नाशिक व मुंबई येथे कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. मोदी यांच्या दौऱ्यांवरून विरोधक लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप व मित्र पक्षांसाठी पोषक वातावरण नसल्यानेच पंतप्रधानांचे दौरे वाढले असल्याची टीका करत आहेत.
मोदींचे दौरे, सर्व्हेचा परिणाम | Rohit Pawar on PM Modi in Solapur
“आदरणीय मोदीजी आज राज्यात आहेत, राज्यातले मोदी साहेबांचे वाढते दौरे बघता मागील काळात आलेले सर्व्हे भाजपने चांगलेच गांभीर्याने घेतलेले दिसतात आणि त्यासाठीच पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा यांसारखे साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
कांदा, सोयाबीन, द्राक्ष, तूर उत्पादक शेतकरी हताश
ट्विटमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्दा उपस्थित करताना रोहित पवार यांनी, “विकासपुरुष’ ही मोदी साहेबांची प्रतिमा आहे आणि याच प्रतिमेला बघून अनेक जण भाजपवासी झाले असल्याचे सांगतात. आज राज्यात कापसाला भाव नाही, निर्यातीच्या धोरणामुळे कांदा, सोयाबीन, द्राक्ष, तूर उत्पादक शेतकरी हताश आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती प्रक्रिया, बेरोजगारी यामुळे युवा वर्ग निराशेच्या गर्तेत आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कमर्चारी, कंत्राटी कर्मचारी यासारखे अनेक घटक आज आंदोलने करत आहेत.” असा दावा केला.
मराठा-धनगर-मुस्लीम-लिंगायत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित
“मराठा-धनगर-मुस्लीम-लिंगायत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, परंतु या सर्व प्रश्नाकडे राज्यसरकारच्या धुरिणांचे लक्ष जात नाही. आदरणीय मोदी साहेब आज आपण महाराष्ट्रात आहात, किमान आज तरी अस्वस्थ आणि रखरखत्या महाराष्ट्राच्या मनाची बात आपण करावी ही मराठी मनाची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल ही आशा आहे.” असेही रोहित पवार यांनी म्हंटले.
इतर महत्वाच्या बातम्या
उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे… PM मोंदीच्या उपस्थितीत मंचावरील एका भाषणाने व्यासपीठावर ‘गोंधळ’