Arya Ambekar : अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेची जोरदार तयारी केली जात आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अयोध्येत रामलल्लाची मूर्ती प्रस्थापित होणार आहे. यासाठी देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यानिमित्त संदीप खरे यांनी लिहिलेले ‘हदय मे श्रीराम है’ गाण्याचे संगीत दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांनी केले. तर दिग्गज गायक सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करण्यात आले आहे. हे गाणे अनेकांच्या पसंतीस पडले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहे.
‘हृदय मे श्रीराम है’ हे सध्या लोकप्रिय होत आहे. नरेंद्र मोदींनी यागाण्याची लिंक शेअर करत लिहिले, ‘अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण देश रामाच्या भक्तीत लीन झाला आहे. लोकांची हीच भावना सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी आपल्या सुमधुर सुरातून दर्शवली आहे.’ त्यांच्या पोस्टनंतर आर्याने देखील आनंद व्यक्त केला आहे. तिनेही भावूक पोस्ट शेअर मोदींचे आभार मानले.
View this post on Instagram
आर्याने पोस्ट करत लिहिले की, ‘जय श्रीराम, पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि त्यांच्या कामाची एक प्रामाणिक चाहती असताना त्यांची ही पोस्ट पाहून माझे डोळे पाणावले आहेत. मी शब्दात सांगू शकत नाही पण इतका आनंद मला याआधी कधीच झाला नसेल. आमचा हा खारीचा वाटा ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्या पर्यंत पोहचला, अशी भावना मनात निर्माण झाली.’
पुढे तिने लिहिले की, ‘प्रिय मोदीजी, तुमचे मनापासून आभार 22 जानेवारी हा महत्वाचा दिवस आपण साजरा करत आहोत. त्यासाठी आमचा जो हा खारीचा वाटा आहे याची तुम्ही दखल घेतलीत. देशसेवेसाठी आम्ही नेहमीच गाण्याच्या माध्यमातून तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवत काम करण्याचा प्रयत्न करु. तुमचा प्रचंड आदर करते आणि तुमचा आशीर्वाद घेते.’